करुणाष्टके
अनुदिनी अनुतापें तापलों रामराया ।
परम दिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजन जनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कास तूझी धरावी ॥ २ ॥
विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥
रघुकुळ टिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥
तनु-मनु-धनु माझें राघवा रूप तुझें ।
तुजविण मज वाटे सर्व संसार ओझें ॥
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचळ भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥
जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्रिपुकुळ माझें तोडि याचा विरोधु ॥ ६ ॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं पाहिली वाट तूझी॥
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥ ७ ॥
सबळ जनक माझा राम लावण्यपेठी ।
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं प्राण ठेवूनि कंठीं ।
अवचट मज भेटी हाती घालीन मीठी ॥ ८ ॥
जननि जनक माया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥
तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥
स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे ।
रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती ।
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे ।
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं ।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥
सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें ।
भजन सकळ गेलें चित्त दुश्चीत जाले ॥
भ्रमित मन वळेना हीत तें आकळेना ।
परम कठिण देहीं देहबुद्धि गळेना ॥ १३ ॥
उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं ।
सकळ भ्रम विरामीं राम विश्रामधामीं ॥
घडिघडि मन आतां रामरूपीं भरावें ।
रघुकुळ टिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥
जळचर जळवासी नेणती त्या जळासी ।
निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥
भुमिधर निगमांसी वर्णवेना तयासी ।
सकळ भुवनवासी भेट दे रामदासीं ॥ १५ ॥
श्रेणी : विविध भजन
Karunashtake With Lyrics | करुणाष्टके | Shree Samarth Ramdas Navami Special | Rajshri Soul
करुणाष्टके हिंदी मे लिरिक्स Karunashtake With Hindi Lyrics, Vividh Bhajan, by Singer: Samarth Ramdas Swami Ji
Note :- वेबसाइट को और बेहतर बनाने हेतु अपने कीमती सुझाव नीचे कॉमेंट बॉक्स में लिखें व इस ज्ञानवर्धक ख़जाने को अपनें मित्रों के साथ अवश्य शेयर करें।